मुंबई – बीसीसीआय, अध्यक्ष सौरव गांगुली, राहुल द्रविड व कथित पत्रकार यांबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या भारताच्या यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने अखेर त्या पत्रकाराचे नाव उघड केले. हा पत्रकार वरिष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार हाच असल्याचे त्याने जाहीर केले आहे. आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता असून, बीसीसीआय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. याच बोरियाने साहाला मुलाखतीसाठी धमकावले होते, असे साहाने आपल्या आरोपात म्हटले होते.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास व चौकशी बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय समितीने सुरू केली आहे. याच चौकशीत साहाने हा खुलासा केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर साहाने 19 फेब्रुवारीला एक ट्विट केले होते. यात त्याने एका पत्रकाराने मुलाखतीसाठी धमकावल्याचाही आरोप केला होता. त्याने बोरिया यांच्यासोबत झालेल्या संवादाचे काही स्क्रिनशॉटही शेअर केले होते. साहाने त्यावेळी नाव जाहीर केले नव्हते. साहाने मुलाखतीला नकार देऊन अपमान केल्याचा मजकूर त्या स्क्रिनशॉटमध्ये होता. ते पत्रकार बोरियाच असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात होते. अखेर ते नाव उघड झाले.
इथून पुढे संघनिवडीसाठी तुझा विचार होणार नाही. त्यामुळे तू आता निवृत्तीचा विचार कर असे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आपल्याला सांगितले होते, असा आरोपही साहाने केला होता.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संदर्भातही वृद्धिमान साहाने वक्तव्य केले होते. कानपूर कसोटीत मी न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यावेळी गांगुली यांच्याकडून मला एक व्हॉट्सऍप संदेश आला होता. त्यामध्ये जोपर्यंत मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तोपर्यंत तू संघामध्ये राहशील असे लिहिले होते. गांगुलीकडून आलेल्या त्या मेसेजने माझा आत्मविश्वास वाढवला. पण आता अचानक सर्वकाही बदलले आहे, असे साहाने सांगितले होते.
मुजुमदार यांनी वृत्त फेटाळले
साहा याच्याशी मी संपर्क साधला होता. आमच्यात अनेक संदेश पाठवले व वाचले गेले. मात्र, मी त्याला जी मुलाखत देण्याची विनंती करताना गमतीने दरडावलो होतो, त्याचा त्याने गौरसमज करून घेतला व माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. वास्तविक मी त्याला धमकावले नव्हते, असा खुलासा आता बोरिया यांनी केला आहे.