जम्मू काश्‍मीरमधील मोबाईल इंटरनेट खंडीत आणि पुन्हा सुरू

श्रीनगर : संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफझल गुरू याला फासावर लटकवल्याच्या घटनेला 7 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जम्मू काश्‍मीर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मोबाईल इंटरनेटसेवा आज खंडीत केली होती. काही विभाजनवाद्यांनी काश्‍मीर खोऱ्यामध्ये बंद पुकारला होता. म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पहाटेपासून मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत केली गेली.

संध्याकाळी हे मोबाईल इंटरनेट पुन्हा सुरू केले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी राज्यघटनेतील 370 कलम रद्द केल्यानंतर खंडीत केले गेलेली 2 जी इंटरनेट सेवा तब्बल 5 महिन्यांनंतर 25 जानेवारीला पुन्हा सुरू करण्यात आले होते.

अफझल गुरूच्या फाशीचा स्मरणार्थ बंद पुकारणाऱ्या जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंट या बंदी घातलेल्या संघटनेविरोधात पोलिसांनी “एफआयआर’दाखल केली आहे. डिसेंबर 2001 च्या संसद हल्ल्यातील भूमिकेबद्दल अफझल गुरू याला 2013 मध्ये दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली होती. “जेकेएलएफ’ने रविवारी आणि मंगळवारीही “जेकेएलएफ’चा संस्थापक मोहमद मकबूल भट याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ बंद पुकारला आहे.

या बंदबाबतचे निवेदन प्रसिद्ध केल्याबद्दल दोन पत्रकारांना पोलिसांनी समन्स बजावले होते. पाच तासांच्या चौकशीनंतर या पत्रकारांना सोडून देण्यात आले. दरम्यान आजच्या बंदमुळे काश्‍मीर खोऱ्यातील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.