नवी दिल्ली – तृणमुलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करणाऱ्या ईडीच्याच दोन अधिकाऱ्यांवर पश्चिम बंगाल पोलिसांनी नोटीसा जारी केल्या आहेत. राजकीय हेतूने खोटी कारवाई केल्याचा ठपका पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीवर ठेवला आहे.
त्या प्रकरणात ईडीनेही दिल्ली हायकोर्टात धाव घेतली असून आमच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेल्या नोटीसा रद्द करण्याची मागणी त्यांनी त्यात केली आहे. त्यावर 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येईल असे कोर्टाने नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या यंत्रणेचा वापर करून मनि लॉड्रिंग प्रकरणात चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप ईडीने केला आहे. पश्चिम बंगालचे पोलिस अभिषेक बॅनर्जी यांच्यावतीने कार्यरत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.