मोदी, शहांची एकधिकारशाही संपविण्यासाठी मनसे प्रचारात – किशोर शिंदे

पिंपरी – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधी प्रचार करणार असून मावळ लोकसभा मतदारसंघातही प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. शिवसेनेच्या उमेदवारला मत म्हणजे मोदी यांनाच हे मत जाणार असल्याने श्रीरंग बारणे यांच्या विरोधात मनसे काम करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनसेची भूमिका शहरवासीय व मनसेच्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड प्रभारी रणजित शिरोळे, गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह मनसेचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही कोणत्याही युतीत न जाता देशाला एकधिकारशाहीकडे घेवून जाणाऱ्या नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत. देशासाठी ही जोडी घातक असून पुन्हा मोदींचे सरकार आले तर लोकशाही अडचणीत येऊ शकते.

गतवेळी यांनी दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. केवळ घोषणाबाजी आणि सर्वसामान्यांची फसवणूक या सरकारने केली आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात कार्यकर्त्यांना व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. ज्याला जिथे काम करायचे आहे तिथे त्याने करावे, असेही ते म्हणाले. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने बारणे निवडून आल्यास मोदी पंतप्रधान होण्यास मदतच होणार असल्याने आम्ही बारणे आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचेही ते म्हणाले.

देशातील निवृत्त सेनाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेनेचा वापर राजकीय प्रचारासाठी करू नये, याबाबत राष्ट्रपतींना निवेदन दिल्याचे सांगून शिंदे म्हणाले, आजपर्यंत देशातील एकाही पक्षाने राजकीय स्वार्थासाठी सेनादलाचा कधीही वापर केला नव्हता. मात्र मोदी यांनी हा वापर करून राजकारण खालच्या पातळीवर नेले आहे.

प्रचाराची यंत्रणा आजपासून राबविण्यास सुरुवात करण्यात येणार असून राज ठाकरे यांची भाषणे असलेल्या डिजिटल गाड्या, कोपरा सभा, दुचाकी रॅली व घरोघरी जावून आम्ही विरोधी पक्षांना मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याचेही शिंदे म्हणाले. संपूर्ण शहरात प्रचाराची अतिशय चोख पद्धतीने यंत्रणा राबविणार असून प्रभाग स्तरावरील नियोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.