पुणे – शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा यावर आवाज उठवत कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सरकारचे याप्रश्नांकडे लक्ष वेधले.
पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून कोयता गॅंग ही नवीन गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास आली आहे. पोलीसांचा गुन्हेगारावर वचक राहिलेला नाही. सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शहरातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंदे यावर आमदार धंगेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
शहरातील सुरु असलेले अवैध धंद्यांतून गुन्हेगारांना रसद पुरवली जात असून पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब धंगेकर यांनी सभागृहात मांडली. शहरात पब संस्कृती वाढीस लागली आहे, रात्री उशीरापर्यंत हे पब सुरु असतात, तरुणाई याकडे वहावत चालली आहे, गृहमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी धंगेकर यांनी विधानसभेत केली.