नगर -तालुक्यातील निंबळक येथून नागरिकांना पुरेसे धान्य मिळत नसल्याची वारंवार तक्रार होत असल्याने, आमदार निलेश लंके यांनी रेशन दुकानाला अचानक भेट दिली. दुकानातील मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली. नागरिकांना वेळेत धान्य वाटप करा असा इशारा दिला. तसेच यापुढे तक्रारी आल्यास व गोरगरीबांची फसवणुक झाल्याचे आढळल्यास सोडणार नसल्याचे थेट तंबीच त्यांनी रेशन दुकानदारास दिली.
निंबळक येथून रेशन दुकानदार धान्य देत नसल्याच्या अनेक तक्रारीचे फोन आमदार लंके यांच्याकडे होत होती. याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले. रेशन दुकानाची चौकशी करताना धान्य साठा शिल्लक राहत असल्याचे निदर्शनास आले. तर एका दुकानदाराने आपले रेकॉर्डच ठेवले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली.
त्यांनी पुरवठा अधिकारी यांना धान्य वितरणाबाबत होत असलेल्या चुकांबाबत माहिती दिली. आमदार लंके गावात आल्याचे कळताच अनेक महिला भगिनी कुपन घेऊन त्यांच्याकडे आल्या. आमदार लंके यांनी दुकानदारास सुचना करुन केशरी रेशनकार्डसह इतर लाभार्थींना त्यांच्या हक्काचे अन्न-धान्य देण्याचे व संकट काळात उत्तमपणे काम करुन तक्रारी येऊ न देण्याचे आवाहन केले.