आमदार जगताप यांची काळेवाडीत झंझावाती पदयात्रा

मतदारांशी साधला संवाद : महिलांचा मोठा सहभाग 

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवेसना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडीमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या पदयात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आमदार जगताप यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांना काय हवे आहे याचा विचार करूनच एका ठराविक भागाऐवजी मतदारसंघात चौफर विकासकामे केली. त्यामुळे निवडणुकीत आमदार जगताप यांचा विजय कोणीही रोखू शकणार नसल्याचा विश्‍वास काळेवाडीतील भाजप, शिवसेना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

काळेवाडी पुलाजवळील लकी बेकरी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली. मुख्य रस्त्याने ज्योतिबा मंगल कार्यालय, पाचपीर चौक पुढे रहाटणी फाट्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. त्यात नगरसेविका निता पाडाळे, माजी नगरसेविका ज्योती भारती, माजी नगरसेवक व भाजपचे मंडल अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, प्रभाग स्वीकृत सदस्य देवीदास पाटील, विनोद तापकीर, माजी नगरसेविका ललिता पाटील, विलास पाडाळे, महिला सरचिटणीस छाया पाटील, चिटणीस धर्मा पवार, सुरेश पाटील, प्रतिभा ताम्हणकर, सोमनाथ तापकीर, पुष्पा नढे, किरण नढे, वॉर्ड अध्यक्ष विशाल वाळके, भरत ठाकूर, कैलास सानप, प्रदीप शिंदे, काळूराम नढे, कल्पना काकुळदे, विलास नढे, आकाश भारती, बजरंग नढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पदयात्रेच्या सुरूवातीला बोलताना नगरसेविका नीता पाडाळे म्हणाल्या, एखाद्या मतदारसंघाचा विकास कसा करावा, हे आमदार लक्ष्मण जगताप यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघात विकासकामे केली. चिंचवड मतदारसंघात झालेला विकास हा सर्वसामान्यांचा विकास आहे. या मतदारसंघातील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न असतो.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी प्रशासनाला पुढील 50 वर्षांचे नियोजन करायला लावले. त्यानुसार कामे सुरू झाली आहेत. चिंचवड मतदारसंघात रस्ते प्रकल्पाची अनेक मोठी कामे झाली असून, आणखी महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्या माध्यमातून मतदारसंघ वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचे नियोजन आहे.

मतदारसंघात शास्वत विकास करण्याचा निश्‍चय करून आमदार जगताप वाटचाल करत आहेत. त्यांच्या कार्याची पावती म्हणून काळेवाडीतील जनता निवडणुकीत जगताप यांना भरघोस मतांनी विजयी करणार असल्याचा विश्‍वास पाडाळे यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे याची जाणीव ठेवून मतदारसंघात विकासकामे केली आहेत.

मतदारसंघातील सर्व प्रलंबित प्रश्‍न त्यांनी सरकार दरबारी मांडले. अनेक प्रश्‍न मार्गी लावण्यात त्यांना यश आले. शहराच्या पाणी प्रश्‍नावर कायमची उपाययोजना त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे. आमदार जगताप यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे चिंचवड मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली आहेत.

त्यांनी मतदारसंघात उभे केलेल्या विकासकामांची चर्चा राज्यभरात होत असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच कार्यकर्ते हक्काने प्रचार करीत आहेत. मतदारसंघातील जनतेचाही झालेल्या विकासकामांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांना काळेवाडीत मताधिक्‍य मिळणार असल्याचा विश्‍वास ताम्हणकर यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)