Mizoram Assembly Election 2023 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. राहुल गांधी हे दोन दिवसाच्या मिझोराम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान, आयझॉल येथे पोहोचलेल्या राहुल गांधींनी शहरात पदयात्रा काढली. यावेळी काँग्रेस समर्थकांसह जनतेनेही त्यांचे जंगी स्वागत केले.
या भेटीदरम्यान राहुल गांधी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांशीसंवाद साधला. दरम्यान, या पदयात्रेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज सायंकाळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करत मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “मणिपूरमध्ये लोकांचे जीव घेण्यात आले, माता-भगिनींवर अत्याचार करण्यात आले पण पंतप्रधानांना तिथे जाण्यासाठी वेळ मिळाला नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.
जननायक के लिए उमड़ा मोहब्बत का सैलाब ❤️ pic.twitter.com/5OBuXZf9FW
— Congress (@INCIndia) October 16, 2023
दरम्यान, राहुल गांधी दोन दिवसांच्या मिझोराम दौऱ्यावर पोहोचले आहेत. सोमवारनंतर मंगळवारी (17 ऑक्टोबर) ते काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर ते लुंगलेई येथे जातील आणि आगरतळा मार्गे दिल्लीला परतण्यापूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करतील.
गेल्या आठवड्यात 7 नोव्हेंबर रोजी ईशान्येकडील राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचा पहिला दौरा आहे. 40 जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.