नवी दिल्ली : पाळीव प्राणी आणि पक्षी हे लोक आजकाल लोकांसाठी अत्यंत संवेदनशील विषय झाला असल्याचे दिसत आहे. कारण अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यावर, पक्ष्यावर अगदी मनापासून प्रेम करत असतात. आणि हेच प्राणी जर आपल्यापासून दूर झाले तर त्यांना किती दुःख होते याची प्रचिती देणारी घटना समोर आली आहे. आपला पाळीव पोपट हरवल्याने त्याच्या मालकाने चक्क शहरभर त्याचे पोस्टर लावले आहेत आणि तो शोधून देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले आहे. दरम्यान या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मध्य प्रदेशातल्या दमोहमध्ये ही घटना घडली आहे. दमोह शहरात कोतवाली भागातल्या इंद्रा कॉलनीत राहाणाऱ्या सोनी यांच्या कुटुंबाकडे मागच्या दोन वर्षांपासून पोपट पाळला होता. संपूर्ण कुटुंबाला हा पोपट आवडत होता. संध्याकाळी त्या पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढून फिरवूनही आणले जात असे. बुधवारी संध्याकाळीही पोपटाला सवयीप्रमाणे बाहेर फिरायला नेण्यात आले होते.
Help us trace our missing Mitthu, get Rs 10,000, is a family’s appeal in MP’s Damoh district. The family is searching it’s pet parrot, which flew out of fear of barking dogs while on morning walk with family’s head. @NewIndianXpress @TheMornStandard @santwana99 @Shahid_Faridi_ pic.twitter.com/n2b22Jw0zF
— Anuraag Singh (@anuraag_niebpl) August 2, 2023
पोपटाचे मालक त्या पोपटाला खांद्यावर बसवून फिरायला घेऊन निघाले. त्यावेळी रस्त्यावर पोपटाकडे पाहून एक कुत्रा भुंकू लागला. यानंतर पोपट कुत्र्याच्या भीतीने उडाला. एका झाडाच्या फांदीवर पोपट जाऊन बसला पण त्यानंतर तो हरवला. म्हणून आता सोनी कुटुंबाने जागोजागी या पोपटाचे पोस्टर्स लावले आहेत. काही नेटकऱ्यांनी यासंबंधीचा व्हिडीओही ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
संपूर्ण रात्रभर पोपटाचा शोध सोनी कुटुंबाने घेतला. मात्र पोपट काही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पोपटाचे पोस्टर तयार केले त्याला शोधून देणाऱ्याला १० हजारांचे बक्षीसही जाहीर केले. एक ऑटो रिक्षा घेऊन त्यातून पोपट हरवला आहे तो शोधून देणाऱ्याला १० हजारांचे बक्षीस देऊ अशा घोषणाही करण्यात येत आहेत. अनेकांना ही घोषणा ऐकून आश्चर्य वाटतं आहे तर अनेकांना या कुटुंबाचे पक्षी प्रेम पाहून सुखद धक्काही बसतो आहे. सध्या पोपट शोधून देणाऱ्याला आम्ही १० हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे पण कुणी जास्त पैसे घेऊन पोपट शोधून देणार असेल तर आम्ही ते पैसेही द्यायला तयार आहोत असं सोनी कुटुंबाने म्हटलं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.