मुंबई – मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन आज गुरुवारी पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना राहण्यासाठी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन इमारती या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत. मनोरा आमदार निवास हे अनेक सोई-सुविधांनी उपयुक्त असणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी माहिती दिली आहे.
१९९०च्या दशकात बांधण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासातील चारही इमारतींची अवस्था धोकादायक झाली होती. शेवटी या चारही इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आमदार निवासाच्या कामासाठी सुमारे पाच वर्षांचा विलंब झाला आहे. यामध्ये ८५० गाड्यांसाठी पार्किंग, कल्ब हाऊस, जिम्नॅशिअम, कॉन्फरन्स हॉल, रेस्टॉरंट अशा अनेक अत्याधुनिक सुविधा या आमदार निवासामध्ये असणार आहे. यामुळे सर्व आमदारांना एकाच ठिकाणी राहता येणं शक्य होणार आहे. यासाठी सुमारे १२०० कोटी खर्च केला जाणार आहे.
“हा प्रकल्प चार वर्षांपूर्वी आखण्यात आला होता. त्यामुळे प्रकल्पखर्च हा चार ते पाच वर्षांपूर्वीचा होता. आता प्रकल्पाच्या क्षेत्रफळातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्प खर्च वाढला आहे. अधिवेशन किंवा आपल्या मतदारसंघातील कामे घेऊन आमदार मुंबईत येत असतात. त्यांच्या निवासासाची सोय करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. त्यासाठी निवासस्थान असणे आवश्यक आहे,” असे नार्वेकर म्हणाले.
नव्या आमदार निवासामध्ये कोणकोणत्या सुविधा असणार ?
- सर्व सुविधा असलेल्या एकूण ३६८ खोल्या असतील.
- एक इमारत २८ मजली, तर दुसरी इमारत ४० मजली असणार आहे.
- १३ हजार ४२९.१७ चौरस मीटर भूखंड क्षेत्र आहे.
- प्रत्येक आमदाराला एक हजार चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे.
- स्वयंपाकघर, अतिथीगृह, ग्रंथालय, क्लब हाऊस, मिनी थिएटर या सुविधा असणार.