‘एमआयएम’ कोल्हापूरातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीतील घटक पक्ष असलेला ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (ए.आय.एम.आय.एम.) पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली, ते कोल्हापुरात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला राज्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आघाडी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभेच्या जागा लढवणार आहे. आघाडीचा घटक पक्ष असलेला एआयएमआयएम कोल्हापूर जिल्ह्यातील विधानाभेच्या सर्व जागा लढवणार आहे. वंचितचे अॅड बाळासाहेब आंबेडकर या बाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, असे साळवे यांनी सांगितले.

तसेच ‘एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, अकिल मुजावर यांच्या आदेशानुसार पक्ष वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक लढवणार आहे. गेले दोन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर अनेक इच्छुकांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ३० जुलैपर्यंत आघाडीचे नेते अॅड आंबेडकर यांच्याकडे तीन जिल्ह्याचा अहवाल देण्यात येणार आहे.

एमआयएमवर अनेक राष्ट्रीय पक्षांनी जातीयवादी पक्ष म्हणून शिक्का मारला होता. पण आमचा पक्ष संविधानाचा सरंक्षक म्हणून काम करणार आहे. भारत निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाविरोधात असलेले गैरसमज दूर होत असून नागरिकांचा पाठिंबा आम्हाला मिळू लागला आहे, असे साळवे यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेला शब्बीर शेख, प्रा. शाहिद शेख, भैय्यासाहेब गजवणे, सागर शिंदे, इम्रान सनदी, मेहबूब जमादार, दिलावर मुल्ला, जकी मुल्ला, इरफान बिजली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.