पुणे (सागर येवले) -पोटच्या बाळाबरोबरच ज्या बाळांना आईचे दूध मिळू शकत नाही, त्या बाळांसाठी आपले दूध दान करून अनेक माता आपले “मातृत्वा’चे दर्शन घडवत आहेत. ससून रूग्णालयातील मिल्क बॅंकमध्ये दररोज दोन ते तीन लिटर दूध संकलन होत असल्यामुळे तीनशे ते चारशे बालकांना त्यांचा उपयोग होतो.
जागतिक मातृत्व दिनानिमित्त ससून रुग्णालयातील “मिल्क बॅंके’चा प्रगतीचा आढावा घेतला असता, मागील दहा वर्षांत या मिल्क बॅंकेने हजारो नवजात बाळांना जीवनदानाबरोबरच सुदृढही बनविले आहे. त्यामध्ये पाच हजार मातांचे मोलाचे योगदान आहे. प्रसूत झालेल्या माता तसेच बाळाच्या नियमित तपासणीसाठी येणाऱ्या “आईचे दूध’ या बॅंकेत दान स्वरूपात घेतले जाते. स्वत:च्या बाळाचे पोट भरल्यानंतर राहिलेले दूध दान स्वरुपात करा, असे आवाहन समुपदेशन टीमकडून (परिचारिका) केले जाते.
या आवाहनाला “आई’चाही प्रतिसाद मिळतो. या दुग्धदानातून ससून रूग्णालयतील नवजात शिशू, अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या बाळांना दूध दिले जाते. आजपर्यंत या मातृदुग्ध पेढीने सरासरी प्रतिवर्षी पाचशे ते सहाशे लिटर दुग्ध संकलन केलेले आहे. मार्च 2020 पूर्वी (करोना संसर्गाच्या आधी) मिल्क बॅंकेत दररोज तीन ते चार कधीकधी पाच लिटर दूध संकलन होत असे. मात्र, करोना काळात हळूहळू दूध संकलनात घट झाली. त्यावेळीही डॉक्टरांकडून सर्व खबरदारी घेऊन दुग्धदान करून बाळांना दूध उपलब्ध करून दिले. दरम्यान, आता दूध संकलनातही वाढ होत असल्याचे बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
मिल्क बॅंकेची दशकपूर्ती…
ससून रुग्णालयात 2013 मध्ये तत्कालीन स्त्री-रोगशास्त्र व प्रसुती विभागप्रमुख डॉ. रमेश भोसले, बालरोग विभागप्रमुख आरती किणीकर, डॉ. शिल्पा नाईक यांच्या पुढाकारातून ही बॅंक सुरू करण्यात आली. बॅंकेने आतापर्यंत हजारो बालकांना संजीवनी दिली आहे. दरम्यान, दूध संकलनात वाढ व्हावी, यासाठी ऑगस्ट 2016 पासून मातृदुग्ध संकलन वाहन (ह्युमन मिल्क कलेक्शन व्हॅन) सुरू करण्यात आली. या दुग्धपेढीचा लाभ जून 2017 पासून “सोफोश’ अनाथ संस्थेतील बालकांनाही होत आहे.
मिल्क बॅंकेत दररोज दीड ते दोन कधीकधी तीन लिटर दूध संकलन होते. त्यासाठी आमच्या परिचारिका मातांना भेटून दुग्धदानाबाबत जागृती करतात. हे दूध प्रसूतीनंतर आईला दूध न येणे, एनआयसीयूमध्ये असलेल्या बाळांना दिले जाते. त्यामुळे या बाळांना पावडरचे दूध पाजण्याचे प्रमाण जवळपास 90 टक्क्यांनी घटले आहे.
-डॉ. आरती किणीकर,ससून रूग्णालय