पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील दोन आरोपींनी पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी केलेला रिव्हिजन अर्ज सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी फेटाळला.
अंकुश रामभाऊ हरकळ (वय 44 , रा. किनगांवराजा, ता. सिंदखेडराजा, बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय 42, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यासह डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख (वय 32, रा. महिंद्र ऍन्थिया, खराळवाडी पिंपरी चिंचवड) याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा अर्ज केला होता. या स अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. दोघेही पेपर फोडण्यात सराईत आहेत. दोघांनी रिव्हिजन अर्ज केला आहे. मात्र, रिव्हिजनची व्याप्ती त्रोटक आहे. अर्जदार आरोपींकडून आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींच्या दोन याद्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यावरून आरोपी हे सराईत पेपर फोडणारे असल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्याचा हेतू, कटात अन्य व्यक्तींचा सहभाग उघड करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील बोंबटकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा रिव्हिजन अर्ज फेटाळला.
म्हाडाच्या अ, ब आणि क या संवर्गातील नोकरभरतीची परीक्षा घेण्याचे कंत्राट जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले होते. कंपनीचा संचालक असलेल्या डॉ. प्रितिश देशमुख याने गोपनीयतेचा भंग करून म्हाडाच्या परीक्षेचे पेपर स्वतःकडे बाळगल्याचे आढळले, तसेच संतोष हरकळ व अंकुश हरकळ या दोघांसह पेपरफुटीचा कट रचून सरकारची व परीक्षार्थींची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.