पुणे – शहरातील मेट्रोचे उर्वरित मार्ग सुरू करण्यासाठीचे काम या मार्गावर सुरक्षा तपासणी केल्यानंतरच सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी मार्च 2024 पर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी शुक्रवारी दिली. महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते रूबीहॉल पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर रूबी हॉल ते रामवाडीपर्यंतची सेवा नोव्हेंबर अखेरीस सुरू करण्याचे नियोजन होते.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो सुरू असून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा पाच किलोमीटरचा मार्ग पूर्णत: भूमिगत आहे. हा मार्गही डिसेंबर 2023 पर्यंत सुरू केला जाणार होता. मात्र, आता हे मार्ग मार्च 2024 मध्ये सुरू होणार असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. “पुणे मेट्रोची सध्या प्रति दिवसाला सरासरी 55 हजार इतकी प्रवासी संख्या असून, ती कमी होत नाही. तर स्थिर राहत आहे.
पुण्यातील दोन मेट्रो मार्गांवरील सेवा विस्तारित झाल्यानंतर प्रवासी संख्येत निश्चित वाढ होईल. त्यासाठी उर्वरित राहिले मार्ग सुरू करण्यासाठी मेट्रोचे नियोजन सुरू आहे. या दोन्ही मार्गांच्या बांधकामांचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. मात्र, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा पाच किलोमीटरचा मार्ग पूर्णत: भूमिगत असल्याने सुरक्षेला महामेट्रोचे प्राधान्य आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने सुरक्षा तपासण्या केल्या जाणार असल्याने हा मार्ग सुरू होण्यास उशीर होणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.
बारा ठिकाणी पार्किंगसाठी जागा
सध्या मेट्रो प्रवाशांना पार्किंगसाठी बारा ठिकाणी महापालिकेकडून जागा मिळाल्या आहेत. त्या जागा पार्किंगसाठी विकसित केल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड स्थानक, संत तुकारामनगर, फुगेवाडी, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट, स्वारगेट, आयडीएल कॉलनी, गरवारे महाविद्यालय, मंगळवार पेठ, वनाज डेपो तसेच रेंज हिल तसेच नळस्टॉप येथील जागेचा समावेश आहे.
फीडर सेवेसाठी सर्वेक्षण
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रोचा सहभाग वाढावा तसेच प्रवासी संख्या वाढावी या उद्देशाने मेट्रोकडून प्रवाशांसाठी फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे काही स्थानकांवर त्याला प्रतिसाद मिळत असून काही स्थानकांवर अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक स्टेशननिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे.
त्यासाठी सल्लागार नियुक्ती करण्यात आली असून पीएमपीच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले जाणार असून मेट्रो स्थानकावर येण्यासाठी पीएमपी, रिक्षा याचा प्रभावी वापर कसा करता येईल, त्याचे नियोजन कसे असावे याबाबत अभ्यास करून त्यानुसार सेवा सुरू केल्या जाणार आहेत.