फलटण – फलटण शहरातील बाजारपेठेतील शोरुम्स, दुकाने दिवाळी सणासाठी सजू लागली आहेत. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन घेण्यासाठी विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीवर सवलत, ऑफर्सची सुरुवात केली असून दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदीलांची दुकाने झगमगू लागली आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवाची धामधूम संपल्यावर आता बाजारपेठेला आता दिवाळीची चाहूल लागली आहे.
दिवाळीच्या सजावट साहित्यांने बाजारपेठेची शोभा वाढत आहे. तर कापड बाजारपेठेत जीन्स, शर्ट खरेदीवर जादाच्या ऑफर्स घोषित केल्या आहेत. लहान मोठ्या आकारातील आकाशकंदिल, विद्युत रोषणाईच्या माळा नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. शहरातील कापड दुकान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुम्स सजत आहेत. सणासुदीचे औचित्य साधून एलईडी टीव्ही, वॉशिग मशिन्स, फ्रीज अशा वस्तूंची खरेदी लोक करतात.
विविध वित्तीय संस्थांनी अर्थसहाय करण्यासाठी मोठमोठ्या दुकानातून कक्ष सुरू केले आहेत.सणाची गर्दी कॅश करण्यासाठी विक्रेत्यांनी आकर्षक स्वतंत्र दालने, वस्तूंची आकर्षक मांडणी, रोषणाईचा झगमगाट आणि खरेदीवर सवलत हा फंडा वापरल्याचे चित्र आहे. मोठ्या कापड दुकानात फॅन्सी साड्यांची वेगळी दालने सुरू केली आहेत. लहान मुलांच्या कपड्यांच्या खरेदी मोठी असल्याने ट्रॅकसूटपासून फॅशनेबल कपड्यांची मालिकाच अवतरल्याचे पाहवयास मिळत आहे. दरम्यान बाजारपेठेत आता ग्राहकांची वर्दळ वाढू शकेल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे,शहरातील बाजारपेठेत सजावट साहित्यांची रेलचेल आहे.
सजावट साहित्याच्या दुकानातील लगबग वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गावरील दुकानात आकर्षक व विविधरंगी आकाशकंदील, तोरण विद्युत दिव्यांच्या माळा, रंगीबेरंगी कागदाच्या कलाकृती दाखल झाल्या आहेत. रांगोळी, पणत्यांची विक्री सुरू झाली आहे. दिवाळीची रोषणाई खर्या अर्थाने जाणवते ती झगमगणाऱ्या आकाशकंदीलांमुळेच. दिवाळीच्या दिवसांत पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळात घराघरांबाहेर, खिडक्यांवर, अंगणात लावलेले रंगीबेरंगी आकाशकंदील पाहण्याची मजा काही औरच असते. एखाद्या घराबाहेर मंद प्रकाश देणारा तर एखाद्या आकाशकंदीलातून हिऱ्यातून पडावा तसा प्रकाश बाहेर पडत असतो. दिवाळी सणानिमित्त फलटणच्या बाजारपेठेत विविध रंगांचे, प्रकारांचे आकाशकंदील विक्रीसाठी आले आहेत.