सातारा – सातारा शहरातील बाजारपेठेत विविध नावीन्यपूर्ण आकाशकंदील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी बाजारपेठेत चायनामेड वस्तूंचा बोलबाला दिसून येतो. मात्र यंदा मोती चौक ते पाचशे एक पाटी दरम्यान असलेल्या बाजारपेठेत पर्यावरणपूरक आकाशकंदिलांना मागणी आहे. त्यात हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत. पॉल, मेटॅलिक, रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, साडीचे आणि खणाचे आकाशकंदील यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
महागाई व दुष्काळाचे सावट दीपावली सजावटीच्या वस्तूंवरही दिसून येत आहे. आकाशकंदीलचे भावही 20 टक्क्यांनी वाढले आहेत. दसऱ्या मोठया उत्साहात साजरा झाल्यानंतर सातारा जिल्हावासियांसह सातारकरांना आता दीपावलीचे वेध लागले आहेत. दीपावलीसाठी व्यापारी, दुकानदारांनी जय्यत तयारी केली असून विविध प्रकारची उत्पादने बाजारपेठेत दाखल झालेली आहेत. दिवाळी निमित्त सुशोभित आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फटाके यांनी बाजारपेठ बहरून गेली आहे. मोती चौकापासून हाकेच्या अंतरावरील पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील व पोवई नाका येथील दुकानात माफक दरात आकाश कंदील, रांगोळी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. तरी सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे बच्चे कंपनी दिवाळीच्या खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली नाहीत. मात्र, पुढील दोन दिवसानंतर बाजारपेठा गजबजून जातील असे सागर घोरपडे यांनी सांगितले. सध्या आकाश कंदील 150 ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
ग्राहकांची गर्दी वाढतेय…..
दीपावली सणाच्या खरेदीसाठी सातारा शहरातील बाजारपेठांमध्ये हळूहळू ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. अद्याप दिवाळी आगमनाला एक आठवडा बाकी आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली पसंती मिळावी यासाठी दुकानदारानीही आपापली दुकाने विविध प्रकारे सजवून ठेवली आहेत. तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुलवाले,कटलरी दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानात ग्राहकांची विशेष गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागाला दुष्काळाचा फटका बसल्याने बळीराजा चिंतेत असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे.