राज्यभरातील जिल्हा परिषदांत लवकरच “मेगा भरती’

आरोग्य विभागातील रिक्‍त पदे भरणार : राज्य शासनाची मान्यता

पुणे – ग्रामविकास विभागांतर्गत आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्याच्या विविध पदांची मेगाभरती लवकरच सुरू होणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे.

करोनाच्या संकटामुळे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागाच्या पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तथापि ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक ही पदे आरोग्याशी संबंधित असल्याने राज्यात करोना संसर्ग आणि इतर साथ रोगाची शक्‍यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा तत्काळ मिळणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदांमधील मार्च 2019 मध्ये जाहिरातीतील केवळ आरोग्य विभागाशी संबंधित 50 टक्के रिक्त पदांची भरती करण्यास मान्यता दिली होती. मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज केलेले उमेदवार वगळून इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र राहतील, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.

“महापरीक्षा’ पोर्टल रद्द झाल्याने मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, आरोग्य विभागाशी संबंधित सर्व रिक्त पदांची भरती सामान्य प्रशासन विभागाच्या मार्च 2021 मधील परिपत्रकानुसार ओएमआर

व्हेंडरमार्फत राबविण्यात येणार आहे.
विविध पदांची परीक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराला एकाच दिवशी परीक्षेला उपस्थित राहता येणार आहे. संबंधित उमेदवारास एकापेक्षा जास्त पदांसाठी परीक्षा देता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

पुणे जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागाशी निगडित विविध पदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत या प्रक्रियेला आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत. ही प्रक्रिया कशी राबविता येईल, त्याचे धोरण ठरविले जाईल.
– आयुष प्रसाद, सीईओ, जिल्हा परिषद, पुणे 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.