एसटी सुरू, पण वेळेबाबत अनिश्‍चितता

प्रवाशांची नाराजी आणि तक्रारीदेखील वाढल्या

पुणे  -अनलॉकच्या नियमावलीनुसार एसटीच्या प्रवासी वाहतुकीने धाव घेतली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातून राज्यभरात धावणाऱ्या बसेसची संख्या वाढत आहे. मात्र, एकीकडे संख्या वाढताना प्रवाशांची नाराजी आणि तक्रारीदेखील वाढत आहेत.

पुणे, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि पुणे स्टेशन या स्थानकांतून बसेस धावतात. या ठिकाणाहून जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यांत प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक वाढवण्यासाठी, अधिक उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र एसटीच्या काही कर्मचाऱ्यांकडून योग्य रित्या न मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे सोयीऐवजी अडथळेच अधिक असल्याचे प्रवासी सांगतात.

“मी दररोज स्वारगेट-भोर बसने ये-जा करते. बसची कोणतीही वेळ निश्‍चित नाही. रात्रीच्या वेळी देखील कर्मचारी सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देतात,’ असे महिला प्रवाशांनी सांगितले.

नियोजित वेळापत्रकानुसार एसटीच्या बसेस धावत आहेत. त्यानुसार बसेसचे आरक्षण देखील सुरु आहे. मात्र पूर्वीपेक्षा सध्या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे. स्थानकांत येणाऱ्या बसेस संबंधित आगारांतून रवाना झाल्या आहेत, का याचा अंदाज कर्मचारी घेत आहेत. कर्मचाऱ्यांकडून योग्य रितीने उत्तरे देण्यात येत नसल्यास त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील.
– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.