बैठकांवर बैठका तोडगा कधी ?

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक सहामधील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पाचे काम जवळपास पाच महिन्यांपासून ठप्प आहे. स्थानिक नागरिकांना संबंधित प्रकल्पाच्या जागेत विविध नागरी सुविधा हव्या आहेत. त्यासाठी हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे नियोजन मंगळवारी (दि. 9) आयोजित प्राधिकरण सभेत ठरले आहे. यापूर्वी देखील याबाबत दोन बैठका झालेल्या आहेत. केवळ बैठकावर बैठका घेऊन हा प्रश्‍न सुटेल का? याबाबत तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा नागरिक व्यक्‍त करीत आहेत.

प्रकल्पाची सद्य:स्थिती मांडणारा प्रस्ताव अवलोकनासाठी आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन ठरविण्यासाठी प्राधिकरण सभेसमोर ठेवण्यात आला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे होते. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, आयुक्‍त श्रावण हर्डीकर तसेच प्राधिकरणाचे अन्य सदस्य सभेला उपस्थित होते. प्राधिकरणातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पेठ क्रमांक सहामध्ये गृहप्रकल्प उभारला जात आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 260 तर, अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी 124 सदनिका उभारण्याचे नियोजन आहे. ईडब्ल्यूएसमधील प्रत्येक सदनिकेचे क्षेत्र 502.78 चौरस फूट इतके असेल. तर, एलआयजी सदनिकांचे क्षेत्र 789.97 चौरस फूट ते 895.13 चौरस फूट इतके असणार आहे.

गृहप्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी 2 जानेवारीला प्रत्यक्ष कार्यादेश देण्यात आले. 12 फेब्रुवारीला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्‍ती केली. ठेकेदाराने प्राथमिक सर्वेक्षण व आराखडा करून 14 फेब्रुवारीला प्रकल्पासाठी आवश्‍यक खोदकामाला सुरुवात करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी 15 फेब्रुवारीला स्थानिक रहिवाशांनी ठेकेदारांच्या अभियंत्यांना साईट ऑफिसमध्ये घेराव घालून गृहयोजनेचे काम चालू ठेवण्यास मज्जाव केला. नागरिकांच्या विरोधामुळे 16 फेब्रुवारीपासून या गृहप्रकल्पाचे काम ठप्प आहे.

नागरिकांसह राजकीय नेत्यांचाही विरोध
प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने क्रीडांगण, उद्यान, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई आदी सुविधांचा विचार केलेला नाही. संबंधित गृहप्रकल्पाची जागा पेठ क्रमांक 4, 6 आणि 9 येथील नागरिकांकडून मुलांसाठी क्रीडांगण, ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांसाठी वापरात आहे. त्यामुळे येथील गृहप्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी प्राधिकरण कार्यालयात 11 मार्च आणि 6 मे रोजी दोन स्वतंत्र बैठका झाल्या. दरम्यान, याबाबत आता आणखी तिसरी बैठक होणार आहे. स्थानिक नागरिकांसह आमदार महेश लांडगे आणि स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी प्राधिकरणाकडे केलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.