मेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

पिंपरी – सध्या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. नाशिक फाटा येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या स्थानकासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथून पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी नाशिक फाटा ते कासारवाडी रेल्वे स्टेशन दरम्यानची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

मेट्रो आणि वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी वाहतूक पोलीस विभागातंर्गत येणाऱ्या ग्रेड सेपरेटर आणि सर्व्हिस रोडला मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. नाशिक फाटा येथे उभारण्यात येणाऱ्या स्थानकाच्या कामासाठी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी सेवा रस्त्यावरील व ग्रेड सेपरेटर रस्त्यावरील वाहतूक रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. एक वेळेस सर्व्हिस रोड तर एक वेळेस ग्रेड सेपरेटर अशा प्रकारे रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच येथील मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पिंपरीकडे जाणारा डाऊन रॅम्प बंद ठेवण्यात येणार आहे. जड वाहनांनी सीआयआरटी येथे यू टर्न घेऊन नाशिक फाटा चौकात येऊन पिंपरी-मुंबईकडे जावे. 4.50 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या वाहनांनी मुंबई-पुणे ग्रेड सेपरेटर रस्त्याने डाव्या बाजूने 320 मीटर अंतरापर्यंत विरुद्ध दिशेने जाऊन इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील नवीन मार्ग आउटमधून डावीकडे वळून सेवा रस्त्याने पिंपरी-मुंबईकडे जावे, अशा सूचना वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक बदलाबाबत मेट्रोकडील मार्शल व वाहतूक कर्मचारी यांना करावे, असे आवाहन मेट्रो आणि वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.