शासकीय मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांची माहिती

शिरूर – दोनवेळा यशाने हुलकावणी दिली तरी उमेद आणि जिद्द मात्र सोडली नाही. शेवटी महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेल्या महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख हा शासकिय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. लवकरच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांनी दिली .

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना शेख यांनी शिरूर येथील राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते व महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान रघुनाथदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शेख म्हणाले, महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या मल्लास शासन डीवायएसपी म्हणून नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या मल्लास नोकरीत सामावून घेत नाहीत. तोपर्यंत त्यास आर्थिक बळ शासनाने द्यावे. शेख हे सध्या बारावीत शिक्षण घेत आहेत. पदवीधर होण्यासाठी त्यांना अजून तीन वर्षे लागणार आहेत. शेख यांच्या म्हणण्यानुसार त्यांना स्वतःचे घर नाही. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

शासनाने घरासाठी मदत करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र केसरी किताब पटकाविल्यानंतर काही दिवसांतच घरासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यावर काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. जिद्द, चिकाटी व ध्येय व सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास नक्‍कीच यश मिळू शकते. दोनवेळा यशाने हुलकावणी दिली तरी नाउमेद न होता सराव सुरू ठेवला. यशाने हुलकावणी दिल्यावर सरावासाठी पुण्यात गेलो. तीन दिवस मॅटवर व तीन दिवस मातीवर कसून सराव केला. यशाने हुलकावणी दिली तरी निराश न होता यशासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नवोदित मल्लांना त्यांनी केले.

तरूण पिढीला सपोर्ट
महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांनी त्याच्या काळातील आठवणी जागवित सांगितले की, आजच्या तरूण पिढीला सपोर्ट, विविध सुविधा आहेत. याचा या पिढीने फायदा घ्यावा. खेळाच्या माध्यमातून नाव कमवावे. पवार कुटुंबीयांच्या वतीने शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूर केसरी अशोक पवार, डॉ. संदीप पवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.