सातारा – सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगार व गिरणी कामगार वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी सातारा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मंगळवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता गिरणी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मेळाव्याचे आयोजक आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. हा मेळावा कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनिल राणे व म्हाडाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी तसेच कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गिरणी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गिरणी कामगार, व गिरणी कामगार वारसांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. मेळाव्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनिल राणे, म्हाडाचे प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला येताना संबंधित कामगार किंवा वारस यांनी गिरणी कामगारांचे ओळख पत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ.एस.आय.सी. क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती, आधार कार्ड आणि इतर तत्सम कागदपत्रे घेऊन यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार निवारण केंद्र
दरम्यान, कागदपत्र गहाळ असणे अथवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असणे आदी समस्यांचा निपटारा करण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणीच तक्रार निवारण केंद्र सुरु केले जाणार आहे. त्यामुळे कागदपत्र नसणे अथवा त्यासंदर्भात काही तक्रारी असणाऱ्या कामगार किंवा त्यांच्या वारसांच्या तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात येणार आहे. या सुविधेचाही लाभ गिरणी कामगार, वारस यांनी घ्यावा.