लोणंद – लोणंद नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत ५ किमी लोणंद मॅरेथोनचे रविवार दि ३१ डिसेंबर रोजी “एक धाव आरोग्यासाठी” या उपक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉनसाठी दोन दिवसातच ५०० नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांनाच मोफत टिशर्ट देण्यात येणार आहे. तसेच मॅरेथोन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांनाच मेडल देण्यात येणार आहे.
नगरपंचायत पटांगण येथे वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता या मॅरेथोनचा शुभारंभ करण्यात येणार आहे,यावेळी लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा सीमा खरात व उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर यांनी दिली. यावेळी सपोनि सुशिल भोसले,भरत शेळके, शिवाजीराव शेळके – पाटील, गणीभाई कच्छी, सागर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या ५ कि. मी. लोणंद मॅरेथोनचा मार्ग लोणंद नगरपंचायत पटांगण-शास्त्री चौक- गोटेमाळ- निंबोडी रोड- सेंट अन्स स्कूल- ठोंबरे मळा- बाजार तळ- गांधी चौक- तानाजी चौक- लक्ष्मी रोड- नगरपंचायत पटांगण असा आहे. या मार्गावर स्पर्धकांसाठी निंबोडी फाटा, सेंट अन्स स्कूल कॉर्नर, बाजार तळ या ३ ठिकाणी वॉटर स्टेशन्स करण्यात येणार आहे तसेच विविध पोस्टर्स च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन विषयक संदेश देण्यात येणार आहे.
सहभागी स्पर्धकांना नगरपंचायत पटांगणावर मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर नाष्टा वाटप करण्यात येणार आहे. लोणंद मॅरेथॉन यशस्वी पार पाडण्यासाठी लोणंद रनर्स ग्रुप,बोल्ट द जिम, भैरवनाथ डोंगर ग्रुप, मयुरेश्वर ग्रुप, लोणंद रोटरी क्लब व इनरव्हील क्लब, लोणंद मेडिकल असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. या मॅरेथोनसाठी कै. पुष्पशील (दादा) शेळके-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सुमन सिमेंट पाईप्स औंद प्रोडकट्स लोणंद, उपनगराध्यक्ष रविंद्र क्षीरसागर युवा मंच लोणंद, शांतीकाका सराफ, सागर मामा शेळके-पाटील मित्र परिवार,लोणंद पोलीस स्टेशन, रेणुका हॉस्पिटल लोणंद यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. लोणंद शहरातील सर्व नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.