पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम, नवीन थेरगाव, आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन भोसरी या पाच रुग्णालयांच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता स्वस्त दरामध्ये रुग्णालय परिसरातच औषधे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अनेकदा वेळेवर औषधे मिळत नाहीत. तसेच बऱयाच आजारांवरची औषधे ही महागडी असतात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भार उचलणे कठीण जाते. त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालयांच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.
नॅकोफ इंडिया लिमिटेड या कंपनीला महापालिका रुग्णालय परिसरात अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी थेट पद्धतीने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीला १५० ते १८६ चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच गाळे दरमहा ३२ हजार २४२ रुपये भाडेदराने दहा वर्षांसाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे ३२ दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात येतात. अनेकदा रुग्णांना आवश्यक असणारी औषधे महापालिका रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यामुळे नाइलाजाने खासगी दुकानामधून औषधे आणावी लागतात. औषधे महागडी असतात. त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू केली जाणार आहेत.