श्रीरामपूर – तालुक्यातील माळवाडगाव येथील ग्रामसभेत मागील सत्ताधारी गटाच्या भ्रष्ट कारभाराच्या प्रकरणांची चौकशी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यामुळे ग्रामसभा प्रचंड वादळी ठरली. या प्रकरणावर पडदा पडावा, या हेतूने व ग्रामस्थांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी विरोधकांनी महिलांना पुढे करून महिला ग्रामसभा घेतली गेली नाही, असा मुद्दा लावून धरल्याचा आरोप उपसरपंच शाम आसने यांनी केला.
माळवाडगाव येथे दि.२५ जानेवारी रोजी महिला ग्रामसभा तसेच दि. २६ जानेवारीस सर्वसाधारण ग्रामसभा पार पडली. सरपंच मीना मोरे यांच्याअध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत मागील सत्तांतरानंतर ८ डिसेंबरच्या पहिल्या ग्रामसभेतील मुद्याचे वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मागील सरपंचाच्या काळातील प्रकरणांच्या चौकशीची मागणी लावून धरली. यात प्रामुख्याने शासनाच्या जलजीवन योजनेची मुठेवाडगाव येथील विहीर, रस्त्याचे अतिक्रमण असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने नमूद केले आहे. या योजनेचा दोन कोटी रुपयाचा निधी वाया गेला आहे.
जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी होईपर्यंत ही योजना नवीन सरपंच कमिटीने हस्तांतरित करून घेऊ नये. मागील कमिटीच्या काळात ग्रामपंचयतीच्या मिळकतीच्या नोंदवही (नमुना न.८) मध्ये स्वः मालकीच्या जागेत बेकायदेशीर फेरफार प्रकरणे उघडकीस आली. या फेरफार प्रकरणाच्या चौकशीची मागणीही उपस्थितांनी लावून धरली. पाटपाणी पट्टीसह, पाणीपुरवठा ९ लाख रुपये वीजबिल थकविल्याने नव्याने सरपंच कमिटीच्या दुसऱ्याच महिन्यात पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात आले. पार्ट पेमेंटकरून पाणीपुरवठा सुरळीत केला. ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी उपस्थित ग्रामस्थांना घरपट्टी, पाणीपट्टी, थकबाकी भरण्याचे आवाहन केले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत समावेश करण्यासाठी ओबीसी दाखला असणाऱ्या कुटुंबांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ज्यांनी पाच वर्षांत एकही महिला ग्रामसभा घेतली नाही, अशा लोकांनी आम्हाला सल्ला देण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही आसने म्हणाले.
शासनाच्या नियमाप्रमाणे २५ जानेवारी रोजी माझ्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभा संपन्न झाली असल्याचा खुलासा सरपंच मीना मोरे यांनी केला. जनरल ग्रामसभेबाबत खुलासा करताना त्या म्हणाल्या की, आम्ही सात दिवस अगोदर नोटीस बोर्ड लिहिला होता. परंतु सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाचा फलक आमची नोटीस पुसून लिहिला गेला. ही बाब लक्षात आल्यावर आम्ही पुन्हा २५ जानेवारी रोजी ग्रामसभा फलक लिहिला असल्याचे सरपंच मोरे यांनी सांगितले.