काबूल – राजकीय संकटामुळे अडचणीत आलेल्या अफगाणिस्तानमधील वैद्यकीय पुवठा लवकरच संपुष्टात येणार आहे, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य, रुग्णालयांसाठी औषधे, तीव्र कुपोषित मुलांसाठी पोषण आहार आणि कोविड -19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या वस्तूंचा समावेश असलेल्या आरोग्य किटचा अफगाणिस्तानमध्ये तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
अलिकडेच काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे ट्रॉमा किटचीही मोठ्या प्रमाणात गरज भासते आहे. काबूल विमानतळावरुन व्यवसायिक विमानांची उड्डाणे बंद असल्यामुळे वैद्यकीय साहित्य अफगाणिस्तानात पोहोचवण्यासाठी पर्यायी वाहतुकीची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे “डब्लूएचओ’चे मध्यपूर्वेतील पूर्व विभागागासाठीचे आपत्कालिन संचालक रिक ब्रेनान यांनी म्हटले आहे.
सध्या वाहतुकीवर मोठे निर्बंध आहेत. पण येत्या काही काळात पाकिस्तानच्या मदतीने पर्यायी वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाऊ शकेल, अशी आशा ब्रेनान यांनी व्यक्त केली. या वाहतुकीसाठी काबूलच्या विमानतलाचा पर्याय अप्रस्तुत आहे. म्हणूनच मझार ए शरीफच्या विमानतळाचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.