मुंबई – कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी “शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित “मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये वॉर्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ बालकांच्या कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.
या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधाने काम केले जाणार असून महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधिक राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बॅंक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक करोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.