महापालिकेचा अजब कारभार : व्हेंटिलेटरच्या साहित्याची थेट खरेदी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील आयसीयू आणि एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरसाठी साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. या व्हेंटिलेटरची खरेदीही चक्क एका बांधकाम व्यावसायिकाकडून करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. आताही त्याच व्हेंटिलेटरसाठी पुन्हा साहित्य खेरदी करण्यात येणार आहे. सात लाख रुपयांची ही खेरदी थेट पद्धतीने आणि ती ही एका बांधकाम व्यावसायिकाकडून करण्यात येणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेचा भांडार विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. रुग्णालयांच्या साहित्य खरेदीतूनही कोट्यवधी रुपयांची लूट सुरु आहे. वायसीएम रुग्णालयाच्या आयसीयू आणि एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरसाठी “फ्लो सेन्सर’ आणि “ओ 2 सेल’ या साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे. हे साहित्य निगडी येथील बांधकाम व्यावसायिक श्री कन्सट्रक्शन या कंपनीकडून थेट पद्धतीने केले जाणार आहे. ही कन्सट्रक्शन कंपनी खरेदी करावयाच्या साहित्य उत्पादित कंपनीचे अधिकृत वितरक असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बांधकाम कंपनीकडून वैद्यकीय क्षेत्रातील साहित्याची निविदा न मागविता थेट पद्धतीने खरेदी करण्याचा घाट घालून सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. या साहित्य खरेदीसाठी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. हे दोन्ही साहित्य पुरविण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील कंपनीने महापालिकेला दर सादर केले आहे. त्यानुसार श्री कन्सट्रक्शन ही कंपनी फ्लो सेन्सर आणि ओ 2 सेल हे साहित्य 7 लाख 45 हजार 920 रुपयांना महापालिकेला देणार आहे. हे दर महापालिका प्रशासनाने मान्य करत दोन्ही साहित्य विनानिविदा थेट पद्धतीने खरेदी करण्यासाठी तसेच येणाऱ्या 7 लाख 45 हजार 920 रुपये खर्चास मान्यता घेण्यासाठी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
या दोन्ही साहित्य खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना किंवा वितरकांकडून खरेदी करणे आवश्यक होते. मात्र सत्ताधारी पक्ष व प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवत निविदाप्रक्रियेला तिलांजली दिली आहे. बांधकाम क्षेत्रातील कन्सट्रक्शन कंपनीला वैद्यकीय क्षेत्रातील किती अनुभव असणार आहे याबाबत साशंकता आहे. वाययीएम रुग्णालयामध्ये संपूर्ण राज्यातून गोर-गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. वैद्यकीय कामाचा अनुभव नसलेल्या कंपनीकडून साहित्य खरेदी करून महापालिका प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. अर्थिक लोभाच्या हेतूने भांडार विभागही त्याला डोळे झाकून परवानगी देत आहे. विशेष म्हणजे कोणते ही काम करण्यासाठी ठेकेदाराला अनुभव असावा, अशी अट महापालिकेने घातली आहे. मात्र या बांधकाम कन्स्ट्रकश्न कंपनीला वैद्यकीय गोष्टींचा काहीही अनुभव नसताना त्यांच्याकडून खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने वैद्यकीय विभागाच्या सर्व खरेदीचे अधिकार महापालिका आयुक्तांना आले आहे. त्यामुळे त्या खेरदीबाबत सर्व निर्णय आयुक्तच घेणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची बैठकही रद्द करण्यात आली आहे. आता वैद्यकीय विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींची खरेदी आयुक्त करणार आहेत.
– संतोष लोंढे, अध्यक्ष, स्थायी समिती.
श्री कन्सट्रक्शन हे व्हेंटिलेटर कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. त्यांच्याकडूनच वायसीएम रुग्णालयासाठी व्हेंटिलेटरची खेरदी करण्यात आली होती. त्याच व्हेंटिलेटरच्या दुरुस्तीसाठी आता “फ्लो सेन्सर’ आणि “ओ 2 सेल’ या साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे. ते अधिकृत डीलर असल्याने त्यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहे.
– मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भांडार विभाग