पोर्ट ल्युईस (मॉरिशस) – फ्रेडी वादळामुळे मॉरिशसमधील जनजीवन ठप्प झाले आहे. वादळाचा परिणाम म्हणून तेथे मुसळधार पाऊस सुरू झाला असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सार्वजनिक वाहतूकीवरही परिणाम झाले आहेत. देशातील बहुतेक बॅंका, दुकाने आणि पेट्रोल पंप देखील बंद ठेवण्यात आले आहेत.
सार्वजनिक वाहतूक स्थगित ठेवण्यात आली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. वादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील विमानांची उड्डाणे पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
तसेच समुद्रकिनाऱ्याच्या भागांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी सर्व नागरिकांना अत्यंत सावध राहण्याच्या आणि काही काळासाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत.