पोर्ट ल्युईस, (मॉरिशस) – मॉरिशस विद्यापीठाने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. मॉरिशस विद्यापीठासारखी विद्यापीठे केवळ महत्त्वाकांक्षी तरुणांच्या स्वप्नांसाठी शिडी नाहीत; तर अशी ठिकाणे आहेत जिथे मानवजातीचे भवितव्य घडवले जाते असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
या प्रतिष्ठित विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी मिळणे हा विशेष गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सर्व तरुणांना, विशेषत: तरुणींना त्यांची अनोखी आवड शोधण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणच आपल्याला असुरक्षितता आणि वंचिततेतून संधी आणि आशेकडे वळवते हे नमूद करून राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षणाच्या सामर्थ्याच्या परिवर्तनीय प्रभावाविषयीचा त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. मॉरिशसमधील महात्मा गांधी इन्स्टिट्युललाही राष्ट्रपतींनी भेट दिली. ऐतिहासिक दांडी यात्रेच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रपतींनी महात्मा गांधींना अभिवादन केले.
भारत-मॉरिशस द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनौथ यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगनौथ यांना रुपे कार्ड भेट म्हणून दिले.
सर्व क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या जनतेमध्ये थेट संपर्क अधिक दृढ करण्यासाठी ही भेट मोलाची असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.