खर्डा (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची 30 हजार चौरस फूट प्रतिमा रेखाटण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या या रेखाचित्राची ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून या विक्रमाची नोंद घेतली जाणार आहे.
खर्डा येथे दोन दिवस शिवजयंती महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये रविवारी मध्यरात्री आय लव शिवपट्टण युवकांनी शिंपी गल्ली येथे प्रतिमा पूजन आरती करून साजरी केली. यावेळी शेखर देशमुख ,गणेश धोकटे, रवी कुलकर्णी, सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य महेश दिंडोरे, गणेश शिंदे, वैजिनाथ पाटील, माजी उपसभापती रवी सुरवसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांच्यासह युवक हजर होते. त्यानंतर दिवसभर शाळा, महाविद्यालय, बॅंका, पतसंस्था, बसस्थानक यासह अनेक शासकीय कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील युवकांची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्वराज्य ध्वज किल्ला मैदान येथे येथून निघालेली मिरवणूक खडकपुरा चौक, कमिटी चौक, रविवार पेठ, बसस्थानक परिसर, नवी पेठ, शिर्डी- हैद्रराबाद राज्य महामार्गावर शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयाचा प्रांगणात सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातल्या 30 हजार चौरस फूट जगात सर्वात मोठी प्रतिमा येथे रेखाटली होती. या प्रतिमेचे रेखाटन तीन दिवसांत करण्यात आले. यासाठी दगड, काळा पांढरा चुना, लाल माती, खडी व वह्याच्या साह्याने रेखाचित्रकार उद्देश पघळ, गेवराई येथील युवकांसह सिद्धी आंबेकर, नागेश विद्यालयाचे कला शिक्षक मयूर भोसले व एनसीसी कॅडेट यांचे सहकार्य लाभले. या रेखाचित्राची ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून नोंद घेतली जाणार आहे.