कारवाईवेळी चालकांकडून पळवाट
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर “मास्क वापरावे’ असे सतत सांगूनही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे. मात्र, काही नागरिकांच्या वर्तणुकीत बदल झालेला नाही. याउलट कारवाईतून पळवाट काढली जात असून यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असताना अपघाताचा धोका वाढला आहे.
पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच अनुषंगाने “मास्क वापरा’ असे प्रशासन सांगत आहे. मात्र, अद्यापही अनेक वाहनचालक मास्कचा वापर करत नाहीत. काही जण गळ्यात मास्क किंवा रुमाल अडकवत आहेत. पोलीस दिसल्यावरच मास्क तोंडाला लावत आहेत.
इतकेच नव्हे तर, कारवाई करणाऱ्या पोलिसांना पाहून हे वाहनचालक अचानक “यु-टर्न’ घेत असल्याने यातून अपघात होत आहेत. मास्क न वापरता वाहन चालवणाऱ्यांमुळे स्वत:सह आजूबाजूच्या नागरिकांना देखील करोना संक्रमण होण्याचा धोका उद्भवतो. याच कारणातून पोलिसांनी दंडात्मक कारवाई वाढविली आहे.
सिग्नलवर अपघाताची शक्यता…
मास्क नसणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी चौकांमध्ये पोलीस उभे असतात. मात्र, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक “यु-टर्न’ घेत असल्याने चौकांमध्ये अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय सिग्नलला उभे असणाऱ्या वाहनचालकांना देखील अपघातांचा धोका उद्भवत आहे.