बारामती – शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल पवार यांनी आपल्या शैलीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
रस्त्याबाबत सर्वच स्तरातून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. निधी उपलब्ध करून देऊनही वेळेत कामे सुरू का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे तातडीने सुरू करून पूर्ण करा, असे आदेशच त्यांनी दिले. नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने, जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हा परिषदेने व बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व कॉंक्रीटीकरणाच्या 82 कामांच्या तीन निविदांना मंजुरी मिळाली आहे. सर्व कामांच्या वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या आहेत. ही कामे काही ठिकाणी सुरू झाल्याची बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली. जवळपास 14 कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत.
प्रस्तावित कामे सुरू करणार- बारभाई
मिलिंद बारभाई म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यातही जेथे पावसाने व इतर कारणांनी रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, त्या रस्त्यांची डागडुजीही पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने सुरू करणार आहे. तालुक्यातील विविध ठिकाणच्या पुलांचीही मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने हानी झाली आहे. त्याची कामेही प्रस्तावित करण्यात आली असून तीही सुरू केली जाणार आहेत.