सातारा -जिल्ह्यातील इंग्रजी व खासगी माध्यमांच्या शाळांनी करोनाच्या संकटातही पालकांकडे फी भरण्याचा तगादा लावला आहे. शिक्षण संस्थांच्या या पवित्र्यामुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. काही शाळांनी गेल्या 8 ते 10 दिवसापासून ऑनलाइन अभ्यासक्रम बंद केला आहे. त्यामुळे या शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद आहेत. शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असताना जिल्हयातील नामांकित शाळांनी पालकांच्या मागे पैशाचा तगादा लावला आहे. काही शाळांमध्ये झुम ऍपवरुन ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. या शाळांना याबाबत पालकांनी विचारले असता “पाल्याची शैक्षणिक फी भरा, नंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करतो,’ असे शाळा प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. सध्या कुटुंबाचा गाडा चालवण्याचे आव्हान उभे असताना त्यात फी मागणीची भर पडली आहे. परिणामी पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
संस्थांच्या तगाद्याने काही पालकांनी फी भरली. मात्र, कुटुंबांचा चरितार्थ चालविण्यासाठी पैसे नाहीत, त्या पालकांनी फी कोठून भरावयाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही शाळा शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जात नसताना देखील नियमित शाळेप्रमाणे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने आता ऑनलाइन शाळांबाबत धोरण निश्चित करावे.
तसेच फी भरण्याबाबत तगादा लावला आहे त्या शाळांरवर कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांचे घेतलेले जादा बिल गोरगरीब सामान्य लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून दिले, त्याचप्रमाणे याबाबतीतही जिल्हाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन ज्या शाळांनी पालकांकडून फीचे पैसे घेतले आहेत त्या पालकांना पुन्हा ते पैसे पुन्हा मिळवून द्यावेत, अशी मागणी होत आहे.