नवी दिल्ली – मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत गुरुवारी (27 एप्रिल) 10 अब्ज डॉलर्स अर्थात सुमारे 81.77 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे झुकेरबर्गची एकूण संपत्ती 77.1 अब्ज डॉलर्सवरून (6.30 लाख कोटी रुपये) 87.3 अब्ज डॉलर्सवर (7.13 लाख कोटी रुपये) पोहोचली आहे. मेटाच्या शेअर्समधील तेजीमुळे झुकरबर्ग ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात भारतीय उद्योपती मुकेश अंबानींना मागे टाकून 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. यापूर्वी ते 13 व्या क्रमांकावर होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असणारे मुकेश अंबानी 82.4 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 6.73 लाख कोटी) संपत्तीसह आता 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
यंदाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) फेसबुकचे चांगले परिणाम आले. यामुळे मेटाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. या तेजीचा परिणाम झुकरबर्ग यांच्या नेटवर्थवर दिसून आला. मेटाचा स्टॉक 1 दिवस अगोदर 13.93% च्या वाढीसह 238.56 डॉलर्सवर बंद झाला.
रिल्समुळे टाईम स्पेंट 24% वाढला
फेसबुक व इंस्टाग्रामवर सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे कंपनीला अधिक जाहिराती मिळाल्या. यामुळे या तिमाहीत मेटाचा महसूल 28.6 अब्ज डॉलर्स झाला. हे गत वर्षीच्या तुलनेत 3% जास्त आहे. तसेच रिल्समुळे लोकांचा इस्टाग्रामवरील टाईम स्पेंट 24% ने वाढला आहे, असे मेटाने म्हटले आहे.
झुकरबर्ग यांची संपत्ती 11.6 लाख कोटींवर
एकेकाळी मार्क झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती 142 अब्ज डॉलर्स म्हणजेच 11.6 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी मेटाव्हर्सच्या जगात उतरण्याची घोषणा केली. कंपनीचे नाव फेसबूक ऐवजी मेटा प्लॅटफॉर्म्स केले. या निर्णयामुळे त्यांच्या संपत्तीत 71 अब्ज डॉलर्सची (सुमारे 5.8 लाख कोटी रुपये) घट झाली होती. आता मात्र त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.