Sanjay Rhod Digras Bajar Samiti Election- कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निकालांमधून काही ठिकाणी दिग्गजांना सत्ता राखण्यात यश आल्याचं दिसतंय तर काही ठिकाणी मात्र पराभवाची धूळ चाखावी लागल्याचं देखील पाहायला मिळतंय. मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील बाजार समिती म्हणून पाहण्यात येत असलेल्या दिग्रस (जिल्हा – यवतमाळ) येथे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असून त्यांच्या जिल्हातील बाजार समितीची निवडणूक लागल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथे महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला असून माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
दिग्रसमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप असा सामना पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. बाजार समितीत सत्ताधारी असलेल्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यापुढे देखील आपल्याकडील एकहाती सत्ता कायम ठेवण्याचे कडवे आव्हान होते.
मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेव्हलला एकदिलाने काम केल्याने येथे १८ पैकी १४ जाग्यांवर विजय मिळवण्यात यश आले. संजय राठोड यांच्या पदरी केवळ ४ जागा आल्या असून महाविकास आघाडीच्या वज्रमुठेने त्यांना चांगलाच ठोसा दिल्याचे पाहायला मिळाले.