पीडिता आपल्या बहिणीप्रमाणे; ‘ती’ क्लिप व्हायरल करू नका – सुप्रिया सुळे 

मुंबई : दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यामध्ये एका टोळक्याने प्रेमी युगुलावर हल्ला करून त्याबाबतची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांद्वारे पसरवल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदर प्रेमी युगलावर हल्ला करून मुलीचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, प्रेमी युगलाला मारहाण करत मुलीचा विनयभंग करतानाची दृश्य असलेली ती व्हिडीओ क्लिप अद्यापही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येतीये. समाज माध्यमांवर ही क्लिप व्हायरल होऊ नये यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेटकऱ्यांना एक आवाहन केलं आहे.

याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “जेव्हा तुम्ही त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी क्लिप इतरांना पाठवता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षरीत्या त्या घटनेचं समर्थन करत असता. ही क्लिप पसरवल्याने त्या मुलीच्या गोपनीयतेच्या हक्कावरच बाधा येत असून आपण तिला आपली बहीण समजून ती व्हिडीओ क्लिप इतरांना पाठवणं थांबवलं पाहिजे.” असं आवाहन केलं.

सुप्रिया सुळे यांनी सदर व्हिडीओ हा महाराष्ट्रासाठी कलंक असून तो व्हायरल करू नये असं आवाहन करतानाच, ” नैतिकतेच्या नावाखाली कोणालाही इतरांवर बंधनं लादण्याचा अधिकार नसून राज्याचा गृहखात्याने हल्लेखोर व चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी.” अशी भूमिका मांडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.