सोमाटणे – वयाची पंच्याहत्तरी पार केलेला परंतु मानाने चिरतरुण असलेले एक गृहस्थ मनोज जरांगे सोबत मराठा मोर्चात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की खरवंडी ता. नेवासा, जि. अहमदनगर येथील एकनाथ केरू कातोरे नावाचे हे ७५ वयाचे बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चक्क अंतर्वाली सराटी ते मुंबई आपल्या लुणा गाडीवर निघाले आहेत. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी जात आहे आणि आणखी कितीही दिवस लागले तरी मी जाणार. या बाबांना तीन मुले आहेत यातील एका शेतकरी मुलाने गरिबीला आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आता त्याची मुलगी महाविद्यालयात जाते. किमान तिला तरी आरक्षणाचा लाभ मिळावा व चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बाबांना तीन नातू आणि तीन नाती आहेत यातील मोठी नात आता बीएससी करते आहे. जिला आई आणि वडील दोघेही नाहीत. हे बाबाच तिला आई वडील यांची माया देतात. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या नातीला ७६ टक्के गुण आहेत आणि तिला १८ हजार फी भरावी लागते. तिच्याच वर्गातील इतर समाजाच्या मुला–मुलीना तीन हजार फी द्यावी लागते. शिवाय कमी गुण असले तरी. माझी नात हुशार नसेल तर तिला प्रवेश सुद्धा देवू नका. परंतु जर जास्त गुण असूनही तिला जास्त पैसे भरावे लागले तर आता माझ्या मुलासारखी मी पण आत्महत्या करू का ? असा सवाल यावेळी त्यांनी प्रशासनाला विचारला.
डॉक्टर नाही तर अधिकारी तरी बनविणारच
जर मराठा समाजाची मुले जर हुशार नसली तर त्यांना सवलत देवू नका. परंतु हुशार असणारी मुलेही जर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणार असतील तर त्याना आरक्षण मिळालेच पाहिजे. माझ्या मयत मुलाचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. जरी माझी नात डॉक्टर नाही झाली तरी एक यशस्वी अधिकारी नक्की होईल आणि मी तिला करणारच, असा विश्स्वासही यावेळी कातोरे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केला.