पुणे : समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढाण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण उपस्थित होते.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित मुलांच्या विकासात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिलं. जेवण, कपडे यात काही कमी अधिक झालं तरी चालेल पण शिक्षणाबाबत काहीही तडजोड केली नाही. मात्र, अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे अखेर आम्ही स्वतः विनाअनुदानित शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. यामागे मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं हा मुख्य उद्देश होता. मुलांना शिक्षण देताना आम्ही बालककेंद्री शिक्षणावर अधिक भर दिला.”
वोपाच्या टीमने केलेल्या मदतीने शाळेतील मुलांना आनंदी बनवले आणि शाळेची गोडी लावली. याआधी ते शाळेपासून कारणं शोधून शाळेत येणं टाळायचं. मात्र, अभ्यासपूर्ण प्रशिक्षणामुळे मुलं आणि शिक्षकांमध्ये मित्रत्वाचं नातं तयार झालं, असंही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केलं.
स्वयंसेवी संस्थांमध्ये सर्व धर्माचं प्रतिनिधित्व असाव
कुलकर्णी म्हणाले, “संस्थांमध्ये पारदर्शकता असायला हवी. तेथे भारताचे चित्र दिसावे म्हणजेच सर्वधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायला हवे. संस्थांच्या कारभाराला पुढील पिढीकडे देखील हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आणि संस्थांकडे कामासाठी निधीची कमतरता आहे, तर मोजक्या संस्थांकडे प्रचंड पैसा आहे. ही विषमता देखील कमी करणं आवश्यक आहे.”
शाळांमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण चिंताजनक
शाळांमधील मुलींच्या गळतीचं प्रमाण मोठं असून ते चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणा मुलांची गळती नाही असं सांगते. त्यासाठी प्रमाणपत्र देखील दाखवते. मात्र, मोठ्या प्रमाणात मुलं शाळांपासून दूर शेतात, दुकानात, घरात कामं करत आहेत.”