नवी दिल्ली – संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून आता नव्या संसद भवनातून ( new Parliament House) कामकाज होते आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आणि ते लोकसभेत संमतही झाले. या विधेयकावर भलेही प्रचंड गरमागरम चर्चा झाली असली तरी नव्या सभागृहातील वातानुकुलीत यंत्रणा अर्थात एसी मात्र प्रचंड थंड होता व त्यामुळे काही खासदारांना त्याचा त्रासही झाला.
एसीमुळे कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य अखिलेश प्रसाद सिंह यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना त्यावर औषध घ्यावे लागले. गोळ्यांचे पाकिट हातात घेत एका वाहिनीशी बोलताना अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, नव्या भवनातील एसीमुळे अनेक सदस्यांची प्रकृती बिघडली आहे. 12 पेक्षा जास्त खासदारांनी याबाबत राज्यसभेच्या सभापतींकडे तक्रारही केली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्याच सूत्रांनी वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही एसीचा त्रास झाला. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावर मतदान झाले त्यावेळी त्या सभागृहात उपस्थित राहु शकल्या नाहीत. त्यांनी अदल्या दिवशी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला होता व त्या पूर्णवेळ सभागृहात बसून होत्या.