नवी दिल्ली – संसदेच्या नवीन इमारतीमधील प्रथम अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे. देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी संसदेची नवीन इमारत सज्ज आहे. यामुळे यावेळच्या पावसाळी अधिवेशनाची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनापासून संसदेच्या या इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणारे 20हून अधिक पक्ष प्रथमच येथे पाऊल ठेवणार आहेत, हे विशेष. अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. हे अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. कर्नाटक विधानसभेत जोरदार कामगिरी आणि पाटणा येथे 23 जूनच्या बैठकीनंतर विरोधक एकजुटीमुळे उत्साहात आहेत.
पण दिल्लीतील अध्यादेशावरून आम आदमी पक्षाची झालेली जमवाजमव आणि कॉंग्रेसची या मुद्द्यावरची संदिग्ध भूमिका पाहता विरोधी एकजुटीचीही कसोटी लागणार आहे. मणिपूर हिंसाचारावर विरोधकही हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
2024च्या निवडणुकांपूर्वी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशने उरली आहेत. मोदी सरकारला महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. डिजिटल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, डिजिटल इंडिया ऍक्ट, जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती व दिल्ली अध्यादेशाच्या जागी विधेयक मंजूर करणे त्यापैकी प्रमुख आहेत.