एकाच वेळी 1350 खासदारांना सभागृहात बसता येणार
नवी दिल्ली : नव्या संसद भवनात लोकसभेतील सेंट्रल हॉल इतका मोठा असेल की भविष्यात जरी खासदारांची संख्या वाढली तर सर्व खासदारांची बसण्याची सोय होणार आहे. सरकारकडून प्रस्तावित नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या नवीन इमारतीत 900 आसने असतील. तर संयुक्त अधिवेशनादरम्यान 1350 खासदार आरामात बसू शकतील. सरकारने सेंट्रल व्हिस्टाला पुनर्विकसित करण्याच्या योजनेस मंजुरी दिली आहे. यासाठी 2024 ची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
नवे संसद भवन त्रिकोणी असेल. भविष्यात लोकसभेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या नवीन इमारतीच्या आत आसनांची संख्या वाढवली जाणार आहे. नव्या लोकसभेत दोन आसनांचे बाक असतील. यामध्ये खासदार आरामात एकटे बसू शकतील. तर संयुक्त अधिवेशन काळात यावर तीन खासदार बसू शकतील. अशा पद्धतीने एकूण खासदारांची आसन व्यवस्था असेल.
तीन टप्प्यात ही योजना पूर्णत्त्वास नेली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत तीन किमीच्या टप्प्यात असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राला’ 2021 पर्यंत नवे रुप दिले जाणार आहे. तर भविष्यातील आवश्यकतेप्रमाणे संसद भवनाच्या नव्या इमारतीची निर्मिती 2022 पर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व केंद्र मंत्रालयांना एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी प्रस्तावित समग्र केंद्रीय सचिवालयाची निर्मिती 2024 पर्यंत करण्याचे लक्ष्य आहे. नव्या योजनेनुसार नवीन सचिवालयात 10 भवन उभारले जातील. संसद भवनाच्या अगदी जवळ नवी संसद उभारली जाणार आहे. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे संग्रहालयात रुपांतर केले जाईल