manoj jarange patil – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच सरकारने मुळ मुद्दा बाजूला ठेवत ते स्वतंत्र कोट्याचा विचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांच्या मसुद्याच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी जरंगे यांनी त्यांच्या मूळ अंतरवली सराटी गावात पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जरांगे यांनी सोमवारी मसुदा अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, सगेसोयरे किंवा नातेवाईक कुणबी असल्याची नोंदी असलेल्यांना कुणबी म्हणून ओळखले जाईल. तसेच आपण मराठ्यांसाठी स्वतंत्र कोट्याच्या विरोधात नाही.
परंतु विशेष अधिवेशनात कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या मसुद्याच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करणे आणि ज्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र जारी करणे यावर भर दिला पाहिजे. मात्र, अजूनही सरकारकडून कोणतीही पाउले किंवा चर्चा होताना दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जरांगेंच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे.