बारामती – अल्पवयीन मुलीचा विनयभंग तसेच अपहरणाचा प्रयत्न केल्या प्रकरणी येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी जॉन स्टीफन रहिमत मासी (रा. कोटजोगराज जि. गुरूदासपुर, राज्य पंजाब), यास २ वर्षे सक्त मजुरी व ५०० रू दंड व दंड न भरल्यास १ महिने साधा कारावासची शिक्षा सुनावली.
इंदापुर तालुक्यातील शेटफळ हवेली ते सुरवड रस्त्यावर दि. १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी घडली. घटनेच्या दिवशी पिडीता सुरवड येथील तिच्या शाळेतुन दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घरी चालत चाललेली होती. आरोपी पाठीमागुन पळत पीडीतेजवळ आला व तिला तुम मेरे साथ चलो, असे म्हणुन पीडीतेला उजव्या हाताला धरून ओढत जबरदस्तीने अपहरण करू लागला आणि पीडीतेचा विनयभंग केला.
पीडीता आरडाओरडा करीत असताना शेटफळ येथील दोघेजण मोटारसायकलवर आले व त्यांनी तिची आरोपीच्या तावडीतुन सुटका केली. आरोपीस घटनास्थळी पकडल्याने पीडीतेच्या बाबतीतील पुढील अनर्थ टळला. त्याप्रमाणे इंदापुर पो.स्टेशन ला आरोपीविरूध्द भादवि कलम ३६३,३५४,३५४ड, पोक्सो कायदा कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणाचा तपास सपोनि नागनाथ पाटील यांनी केला.
सदर खटला जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे.पी. दरेकर यांचे समोर चालला. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात आलेला पुरावा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद कोर्टाने ग्राहय धरून आरोपी जॉन स्टिफन रहिमत मासी यास पीडीतेच्या अपहरणाचा प्रयत्न केला म्हणुन २ वर्षे सक्त मजुरी व ५०० रू दंड व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली.या प्रकरणात सरकार पक्षास कोर्ट पैरवी ए.एस.आय. नामदेव नलवडे, इंदापुर पोलीस स्टेशनचे कोर्ट कर्मचारी पो. हवालदार अमोल खैरे पोलीस कर्मचारी मयुर गायकवाड यांनी मदत केली.