कराड उत्तर लढविण्यावर मनोज घोरपडे ठाम

धैर्यशील कदमांची भूमिका अद्याप अस्पष्ट, कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरूच

दत्ता घाडगे

कामेरी  – विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असताना संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून यात कराड उत्तर सुद्धामागे राहिला नाही. कारण विद्यमान आमदारांना आस्मान दाखवण्यासाठी 2014 सालच्या निवडणुकीत महायुतीकडून लढलेले व सध्या जि. प. सदस्य व भाजपाचे नेते आसणारे मनोज घोरपडे यांनी पराभव झाल्यानंतरही खचून न जाता गेल्या 4 वर्षात मतदार संघातील वाडीवस्तीवर जाऊन तगडा जनसंपर्क निर्माण करत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

तर मागील निवडणुकीत विद्यमान आमदारांच्या विरोधात आपली सर्व ताकद पणाला लावत आ. बाळासाहेब पाटलांना कॉंटे की टक्कर देणारे धैर्यशील कदम मागील निवडणुकीपेक्षा सध्या थोडे बॅकफूटवर पाहायला मिळत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेना विभक्त निवडणूक लढली होती. त्यावेळी कराड उत्तरमधून शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना चार आकडी संख्या ओलांडता आली नव्हती. कराड उत्तरमध्ये शिवसेनेचा फार मोठा असा प्रभाव नव्हता आणि आत्ताही नाही. याउलट भाजपाने 4 वर्षात मतदार संघात मोठी ताकद निर्माण केली आहे.

पण यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आणि तीच युती अभेद्य ठेवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याने युती तुटली नाही तर कराड उत्तर मतदार संघ हा सेनेच्या वाट्याला जाणार असल्याने भाजपाचे नेते मनोज घोरपडे कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. तसेच नुकतीच त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या 4 वर्षाच्या कामाचा आढावा दिल्याने त्यांच्या कामावर खूश होऊन मुख्यमंत्र्यांनी थेट बैठकीतूनच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करत मनोज घोरपडेंच्या कामाविषयी माहिती दिली. त्यामुळे मनोज घोरपडे भविष्यात शिवबंधन बांधून निवडणूक लढवू शकतात. “दै. प्रभात’शी बोलताना मनोज घोरपडे म्हणाले, आम्ही सरसेनापती संताजी घोरपडेंचा वारसा जपणारे आहोत. त्यामुळे एकदा रणांगणात उतरलो तर काहीही झाले तरी माघार नाहीच, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

तर दुसरीकडे धैर्यशील कदम हेसुद्धा मी निवडणूक लढवणार यावर ठाम आहेत. दरम्यान, निवडणुकीला काही महिने बाकी असताना त्यांची भूमिका अजून स्पष्ट न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. पण काही दिवसांपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करणार असे बोलले जात असले तरी त्यांच्याकडून याबाबत अधिक दुजोरा देण्यात आला नाही. याउलट शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते सुनील माने यांना निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिल्याची चर्चा होत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र थोडीशी चलबिचल दिसून येत असली तरी सुनील मानेंनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने ते निदान आत्ता तरी ते राष्ट्रवादीतच खूश आहेत.

सध्या कराड उत्तरच्या राजकारणात विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांची पकड मजबूत असली तरी अनेक नाराज नेते व निष्ठावान असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हवेची दिशा ओळखत भाजप-शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करत सामील होणे पसंत केल्याने आ. बाळासाहेब पाटलांसाठी आगामी विधानसभा निवडणुक ही तितकीशी नक्कीच सोपी राहिलेली नाही. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांना धोबीपछाड करण्यासाठी मोठ्या ताकदीने मनोज घोरपडे शड्डू ठोकून उभे असून त्याच्यापाठोपाठ धैर्यशील कदमही विरोधात उतरण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कराड उत्तरच्या राजकारणावर कोणाचे वर्चस्व राहणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.