काहीही करू, पण शिक्षकी पेशा नको!

डी.एल.एड. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साह

पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या प्राधिकरण) राबविण्यात येत असलेल्या प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड.) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी 10 हजार 726 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी निरुत्साह दाखविल्यामुळे 7 हजार अर्जांनी घट झाली आहे.

डी.एल.एड.साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 16 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. यात केवळ 6 हजार 574 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. प्रतिसाद वाढावा, यासाठी 30 जूनपर्यंत अर्जासाठी मुदतवाढ होती. त्यात अर्जाची संख्या काही प्रमाणात वाढली. प्रवेशासाठी नुकतीच पहिली गुणवत्ता यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गेल्या वर्षात 847 अध्यापक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यात 55 हजार 644 प्रवेश क्षमता निश्‍चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात 17 हजार 92 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. यंदाच्या 817 विद्यालयात 53 हजार 642 प्रवेश क्षमता आहे. यासाठी 16 हजार 65 अर्ज दाखल झाले. यातील 5 हजार 339 अर्ज कागदपत्रांच्या पडताळणीत बाद करण्यात आले आहेत. पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.

यंदा 30 विद्यालये बंद
चालू वर्षात शासकीय अध्यापक विद्यालये 16, खासगी अनुदानित विद्यालये 95, कायम विनाअनुदानित 736 विद्यालये, मुंबई महापालिकेची 2 अशी विद्यालये आहेत. यातील काही 30 विद्यालये चालू वर्षात बंद झाली आहेत. यात प्रामुख्याने कायम विनानुदानित विद्यालयाचा समावेश आहे. अनुदानित विद्यालयाची एका वर्षासाठी 3 हजार 300 रुपये, तर विनाअनुदानित विद्यालयात 12 हजार ते 15 हजार एवढी फी घेण्यात येत आहे.

जिल्हानिहाय प्रवेशासाठी पात्र अर्ज
अहमदनगर-622, अकोला-220, अमरावती-414, औरंगाबाद-604, बीड-610, भंडारा-250, बुलढाणा-430, चंद्रपूर-69, धुळे-331, गडचिरोली-27, गोंदिया-397, हिंगोली-119, जळगाव-383, जालना-318, कोल्हापूर-471, लातूर-343, मुंबई-598, नागपूर-598, नांदेड-343, नंदूरबार-132, नाशिक-579, उस्मानाबाद-178, पालघर-145, परभणी-181, पुणे-489, रायगड-48, रत्नागिरी-99, सांगली-293, सातारा-230, सिंधुदुर्ग-27, सोलापूर-475, ठाणे-213, वर्धा-95, वाशिम-178, यवतमाळ-204.

आणखी काही विद्यालये बंद होणार
गेल्या तीन वर्षांत सुमारे 125 डी.एल.एड.ची विद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी बंद करण्यात आली आहेत. यात शून्य पटंसख्या असलेले माणगाव व केवळ 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले सासवणे येथील शासकीय विद्यालय बंद करण्यात आले आहे. यंदाही कमी विद्यार्थी असलेल्या विद्यालयांचे इतर ठिकाणी समायोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आणखी काही विद्यालये बंद करावी लागणार आहेत.

नोकरीची शाश्‍वती नसल्याने विद्यार्थी संतप्त
डी.एल.एड.च्या निकालात दरवर्षी घट होत चालली आहे. त्याबरोबरच आठ वर्षे शिक्षक भरती बंद होती. यामुळे बेरोजगारीत खूप वाढ झाली आहे. शिक्षण घेऊनही बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षकाची नोकरी मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इतर क्षेत्रातील नोकरीचा पर्याय शोधण्याची वेळ पूर्वीच्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. जुन्या विद्यार्थ्यांचे अनुभव पाहता नव्याने डी.एल.एड. करण्यासाठी विद्यार्थी उत्साही नसल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.