Manipur Violence : मणिपूरमधील वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. त्यातच मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळमधील (Imphal) बीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई क्षेत्रात एक अज्ञात मानवरहित ड्रोन (Drone) आढळल्यानंतर सर्व उड्डाणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काल दुपारी म्हणजेच रविवारी या भागात हे ड्रोन आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, इंफाळला जाणारी काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे इंफाळकडे येणारी काही उड्डाणे हवाई क्षेत्रातून माघारी फिरली. त्याचप्रमाणे ही उड्डाणे इतर विमानतळांच्या दिशेने वळवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
A drone that was very small in appearance was spotted by security personnel at Imphal Airport on Sunday at 3 pm. An alert was issued to other agencies at the airport and operations were postponed till security clearance. Three flights were affected due to the security clearance.…
— ANI (@ANI) November 19, 2023
मणिपूरची सध्या कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था फारशी चांगली नाही. त्याच पार्श्वभूमीवर मणिपूरच्या सरकारने 23 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सरकारने घेतलेल्या याच निर्णयानंतर हे अज्ञात ड्रोन आढळून आले. मणिपूरमध्ये कुक्की आणि मैतई समाजामध्ये मागील अनेक महिन्यांपासून जातीय संघर्ष सुरु आहे. मे महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरु आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये जवळपास 200 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
मणिपूरमध्ये गस्तीवर असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांवर गेल्या गुरुवारी म्हणजेच 16 नोव्हेंबर हल्ला करण्यात आला होता. तिरेक्यांनी यापूर्वी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) पेरून हा स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर आसाम रायफल्सच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला.