अकरावी प्रवेश : वेळेत कागदपत्रे सादर करू न शकलेल्यांकडून हमीपत्र
पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासाठी केवळ दहावीचे ऑनलाइन गुणपत्रक अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच, वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करू न शकलेल्यांकडून हमीपत्र भरून घेतले जाणार आहे.
अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्यास दि. 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रवेश अर्ज भाग 2 मध्ये विद्यार्थ्यांना गुणांची माहिती अपलोड करावी लागणार आहे. यंदा करोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रवेश घेण्याची आवश्यकता नाही. प्रवेश निश्चित करण्याबाबत सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी समांतर लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक राहील, अशा सूचना प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी केल्या.