हिंजवडी – राज्यात युतीचे सरकार असताना पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने हाती घेतलेली माण-म्हाळुंगे “टीपी स्कीम’च्या कामाला गती देणार आहे. आगामी काळात ही नगररचना “स्कीम’ जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सूतोवाच “पीएमआरडीए’चा नव्याने पदभार स्वीकारलेले नवनियुक्त आयुक्त राहुल महिवाल यांनी केले.
माण-म्हाळुंगे नगररचना योजना ज्या भूखंडावर प्रस्तावित आहे त्या माण भागाला भेट देऊन त्यांनी जागेची पाहणी केली. या वेळी महानगर आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रामदास जगताप, महानगर नियोजनकार डी. एन. पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीसकर, कार्यकारी अभियंता शीतल देशपांडे, उपमहानगर नियोजनकार गणेश चिल्लाळ, “एमआयडीसी’चे अधिकारी पी. बी. रुईकर व त्यांचे सहकारी अभियंता उपस्थित होते.
महिवाल यांनी हिंजवडी ते म्हाळुंगे-बाणेर येथील मर्सिडीज बेंज कंपनी शोरूमपर्यंत होणाऱ्या 36 मीटर रुंद रस्त्याची पाहणी केली. काम तातडीने पूर्ण करण्याची निर्देश आयुक्तांनी “एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय नगर रचना योजनेतील 1.6 किमी लांब व 24 मीटर रुंद रस्त्याचे रखडलेल्या कामाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी शेतकरी जमीनधारकांना द्यावयाच्या अंतिम भूखंडाचे केलेले सीमांकन व लावलेले नामफलक याची देखील पाहणी केली.
या वेळी नगररचना योजनेतील उपस्थित काही शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. नदीलगतच्या ब्लू लाईनद्वारे (पूररेषा) बाधित भूखंडाचे पुनरवाटपासाठी प्रस्तावित पहिल्या फेरबदल रचना योजनेचा नकाशा प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला आहे. काही सूचना/ हरकती असल्यास 9 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राधिकरणाच्या कार्यालयात समक्ष सादर करण्याचे अवाहन आयुक्त महिवाल यांनी केले आहे.