पुणे – पीएमआरडीए’ने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे. मागील सहा महिन्यांत या मेट्रो मार्गावर 50 खांब उभारण्यात आले आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा इलेव्हेटेड मार्ग आहे. या मार्गावर 23 स्टेशन असणार आहे. या मेट्रो मार्गावर विविध टप्प्यांमध्ये खांब उभारणीच्या कामास गती आली असून, विविध ठिकाणी मेट्रो स्थानकांच्या उभारणीसाठी पाया घेण्याचे काम देखील सुरु झाले आहे.
मेट्रोचा डोलारा समर्थपणे तोलून धरण्यासाठी उभारणी करण्यात येणारे खांब वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत. 2000 मिमी व्यास असणारे हे गोलाकार खांब मेट्रो रेल्वे यंत्रणेच्या आरेखन मापदंडांशी पूर्णपणे सुसंगत असे साकारण्यात येत आहेत. भारतीय मानक ब्युरो तसेच बांधकाम प्रक्रियेशी सुसंगत असलेल्या डिझाइनमध्ये सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल, याची दक्षता घेण्यात येत आहे.
हे खांब मेट्रो रेल्वे आणि अन्य वाहनांच्या रहदारीचा भार तोलण्यास सक्षम तर असतीलच; परंतु त्या जोडीला भूकंप आणि वादळ यांसारख्या अनपेक्षित घटनांचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकणार नाही, अशा प्रकारे त्यांचे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेली आहे, अशी माहिती पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांनी दिली.